लेखकाविषयी

परशुराम रामचंद्र गोखले यांचा जन्म 23 एप्रिल 1938 रोजी नागपूर येथील स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर असणाऱ्या व पुढे संघकार्यास वाहून घेतलेल्या कुटुंबात झाला.  मोठे भाऊ पूर्णतः संघ कार्यास वाहून घेतलेले.  आई-वडिलांचे अल्पशा सहवासाचे छत्र.  तसेच दोन लहान भावंडांची जबाबदारी अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.  त्याकाळी शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासन सेवा करण्यासंबंधी करारनामा असल्याने त्यांना शासन सेवेत रुजू  व्हावे लागले.  त्याच वेळेस 1965च्या युद्धामध्ये देशनी घातलेल्या हाकेस त्यांनी साथ देऊन इमर्जन्सी कमिशन  घेऊन सैन्यदलात  ते दाखल झाले. सुरुवातीचा काही काळ त्यांनी सैन्यदलात आपले कर्तव्य बजावले.  तेथून परत आल्यावर  महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात अनेक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला व ते अधिक्षक अभियंता या पदावरून निवृत्त झाले.

तसे गोखले घराणे हे मूळचे औंध संस्थानातले.  वेदविद्या पारंगत गणेश शास्त्री यांच्या वंशातले. असे असल्याने का कोणास ठाऊक लेखकाला लहानपणापासूनच संस्कृत, इंग्रजी  व गणित या विषयाची अत्यंत आवड.  वडिलांच्या अल्प सहवासामध्ये सुद्धा त्यांना या विषयासंबंधी खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मनात असून सुद्धा इतर जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता त्यांच्या आवडत्या विषयाकडे त्यांना फारसे लक्ष देता आले नाही.  सोनोपंत दांडेकर तसेच शासनाने प्रकाशित केलेली ज्ञानेश्वरी मुळे प्रभावित होऊन जवळ - जवळ गेले पंचेचाळीस वर्षापासून ते आज तागायत ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होते.

निवृत्तीनंतर मात्र त्यांनी अनेक वर्षापासून संस्कृत विषयाच्या अभ्यासाची दबून राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला अहोरात्र झोकून दिले.संस्कृत भाषेतील इतर ग्रंथ जसे वेद, पतंजली योग सूत्र, उपनिषदे इत्यादी चा अभ्यास करण्यासाठी व समजण्यासाठी संस्कृत व्याकरणाचा  अभ्यास सुरू केला  आणि यातूनच पाणिनी सूत्रांचे मराठीत भाषांतर केलेला ग्रंथ त्यांनी निर्मित केला. त्याच बरोबर पतंजली योगसूत्रे व उपनिषदे यांचे मराठीत भाषांतर करून ग्रंथ निर्मिती केली.  तसेच उपनिषदे,  पाणिनी सूत्रांचे मराठी भाषांतर अशी विविध ग्रंथ मालिका तयार केली आहे.  ही सर्व आता लवकरच प्रकाशित केली जाणार आहेत. त्यांचं हे सर्व कर्तुत्व पाहिल्यावर आपल्याला सामान्य माणसाच्या ठाई असामान्य  कर्तुत्व दडलेले असते याची प्रचिती येते.

ज्ञानेश्वरीच का?

लेखक त्यांच्या आयुष्यात अनेक ठिकाणी,अनेक भागांमध्ये तसेच परदेशात सुद्धा जाऊन आले.  तेथे त्यांना प्रकर्षाने जाणवले की ख्रिश्चन धर्माचा बायबल हा ग्रंथ अत्यंत नाममात्र किमतीत खरंतर जवळ जवळ विनामूल्य मिळतो असे म्हणायला हरकत नाही.  परदेशात तर हॉटेलच्या रूम मध्ये सुद्धा बायबल ग्रंथ ठेवलेला आढळतो आणि तो तुम्ही बरोबर नेला तरी तुम्हाला कोणी अडवत नाही.  याच धर्तीवर आपल्याकडेसुद्धा विपुल ज्ञानभंडारानी भरलेली भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वांना का उपलब्ध होऊ नये? असा विचार त्यांच्या मनात सतत येत.  परंतू ग्रंथ छपाई चे गणित हे तितकसं न जमणारे असल्याने त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला  स्वीकारत " घरोघरी ज्ञानेश्वरी "  ही वेबसाईट दहा वर्षापूर्वी स्वखर्चाने सर्व लोकांसाठी विनामूल्य समर्पित केली.

त्यानंतर सुद्धा त्यांचा ज्ञानेश्वरी वरील अभ्यास सुरू होता. त्यांनी आधी तयार केलेल्या घरोघरी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील त्रुटी सुधारून त्यांच्या पश्चात त्यांचा नातू पूर्णेदू गोखले ही वेबसाईट सुधारित आवृत्तीत समर्पित करत आहे.

लेखकाच्या मते साधारणत 60 वर्षावरील व्यक्तीच  अध्यात्माकडे वळते,  परंतु खरं पाहिल्यास विपुल ज्ञानभंडारानी  समृद्ध असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वयाच्या अठराव्या वर्षी मुलांच्या हाती द्यायला पाहिजे.  लेखकाने स्वतः काळाला अनुरूप असे बदलून नवनवे कम्प्युटर क्षेत्रातले तंत्रज्ञान अवगत करून वयाच्या  ८२  व्या वर्षा पर्यंत स्वतःला काळानुरूप अद्ययावत ठेवले.

त्यांची इच्छा होती की सर्व जेष्ठ नागरिकांनी सुद्धा  तंत्रज्ञानाला अवगत करून स्वतःला अद्ययावत ठेवावे.  म्हणूनच हा ग्रंथ त्यांनी स्वतः कम्प्युटरवर निर्मित करून ई-बुकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.

मनोगत

श्री ज्ञानेश्वरीच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत त्यात नवीन भर घालण्याची काही गरज नव्हती. मला स्वतःला गेली दहा-बारा वर्षे ज्ञानेश्वरी वाचताना ज्या काही अडचणी आल्या त्या दूर करण्याच्या हेतूने मी हा प्रयोग हाती घेतला.  याकरिता महाराष्ट्र शासनाची ज्ञानेश्वरीची प्रत आधारभूत मानली आहे.  या प्रतीच्या संपादनाकरीता लोकमान्यांच्या,  गीतारहस्याचा,  सोनोपंत दांडेकर व शिवाजीराव भावे यांच्या शब्दार्थकोषाचा,  स्वरूपानंद सरस्वती,  पावस यांच्या ज्ञानेश्वरीचा,  भिडे यांच्या सार्थ ज्ञानेश्वरीचा आधार घेतला आहे.  बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरांनी श्लोकांवर टीका करण्याचे टाळले आहे.  जसे अध्याय तिसरा  श्लोक 40 ते 43. श्लोकांवरचे  भाष्य काही ठिकाणी गीतारस्त्यातील श्लोकापेक्षा वेगळे आहे.  जसे अध्याय दुसरा श्लोक 46. या विधानामुळे कोणाचाही अधिक्षेप करण्याची इच्छा नाही किंवा ज्ञानेश्वरांना श्लोकांचा अर्थ कळला नाही असे पण मला म्हणावयाचे नाही.  पण माझी भूमिका अशी आहे की वाचकासमोर सर्व मते ठेवावीत.

मी स्वतः ज्ञानेश्वरी हे  एकपात्री  नाट्य समजतो.  यात महाराज,  संजय,  धृतराष्ट्र,  श्रीकृष्ण,  अर्जुन,  निवृत्तीनाथ,  जमलेले श्रोते आणि स्वतः या सर्व भूमिका ते स्वतःच करितात आणि समोर बसलेल्या सामान्य श्रोत्यांना समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वरी सांगतात.  समोर बसलेल्या श्रोत्यांना समजेल व  रुचेल  पण प्रतिपाद्य विषयाला बाधा येणार नाही अशाच पद्धतीने महाराजांनी विवेचन केले आहे.  म्हणून काही  श्लोकांवर चे  भाष्य आटोपते घेतले आहे किंवा  वेगळे केले आहे.

मूळ श्लोक,  त्याचा टिळकांनी केलेला अर्थ,  ओव्या व त्यातील कठीण शब्दांचा अर्थ विरामचिन्हयुक्त एकत्र असल्यामुळे प्रत्येकालाआपल्या  मताप्रमाणे यावर विचार करिता येईल.  त्या काळातील प्रचारातील असलेल्या शब्दांचा अर्थ समजला तर कोणालाही ज्ञानेश्वरी समजेल आणि म्हणून ओव्यांचा मराठी अर्थ मला अनावश्यक वाटतो.  कारण शेवटी स्वतःचा मार्ग स्वतःच  शोधावा लागतो.  तरीपण ज्या ओव्या शासकीय प्रतीत कठीण म्हणून दर्शविल्या आहेत व ज्या मला पण जरा कठीण वाटल्या आहेत त्यांचा अर्थ शासकीय  प्रतीप्रमाणे  व भिड्यांच्या प्रतीतील  अर्थाप्रमाणे त्यात अध्यायाची शेवटी दिला आहे व त्या ओव्यांचे क्रमांकाचे अधि, (+) अशी खूण केली आहे.

महाराजांनी यमक,  अनुप्रास वगैरे अलंकार वापरले आहेत.  काही ठिकाणी पादपूर्णार्थ  शब्दांची योजना केली आहे.  त्यामुळे अन्वय लावून ओवी वाचली तर अर्थ सुलभ होतो.  याकरिता विरामचिन्हे सढळपणे वापरली आहेत.  दोन्ही बाजूला विराम चिन्ह असलेला शब्द प्रथम गाळून व नंतर योग्य ठिकाणी ठेवला तर अर्थ सहज समजतो.  महाराज असे बोलले असतील तसे वाचण्याकरिता विराम चिन्हाच्या ठिकाणी थांबून ओवी वाचली तर अर्थ सहज समजतो.  उदा. अध्याय अठरावा ओवी  1288 मुळात अशी आहे. '' तैसा क्षात्रसंस्कारसिद्धा। प्रकृती घडीलासी  प्रबुद्धा। आता नुठी  म्हणसी हा धंदा। परी उठविजसीचि तू॥ ही ओवी  अशी वाचली तर अर्थ सोपा होतो "तैसा क्षात्रसंस्कारसिद्धा  घडीलासी  प्रबुद्धा, परी आता नुठी  म्हणसी हा धंदा, प्रकृती उठविजसीचि तू."याकरिता प्रकृती या शब्दाच्या दोन्ही बाजूस विरामचिन्हे दिली आहेत. त्याचप्रमाणे जेथे अनुच्चारित अनुस्वार आहेत व अर्थभेद  होत नाही ते अनुस्वार गाळले आहेत.

परशुराम रामचंद्र  गोखले.  

आभार

आभार या आकृतिबंधाची ज्ञानेश्वरीची प्रततयार करण्याची प्रेरणा ज्ञानेश्वर महाराजांनीच दिली असावी म्हणून माझ्यासारखा अल्प बुद्धी ती प्रत्यक्षात उतरू शकला. या प्रतीचा आकृतीबंध ठरवण्याचे काम माझी सौभाग्यवती सौ.  शीला गोखले हिची खूप मदत झाली.  त्याच प्रमाणे प्रत्येक ओवी वाचून मुद्रित प्रत दुरुस्त करण्यास पण तिची मदत झाली आहे. या आकृतिबंधाची ज्ञानेश्वरीची प्रततयार करण्याची प्रेरणा ज्ञानेश्वर महाराजांनीच दिली असावी म्हणून माझ्यासारखा अल्प बुद्धी ती प्रत्यक्षात उतरू शकला. या प्रतीचा आकृतीबंध ठरवण्याचे काम माझी सौभाग्यवती सौ.  शीला गोखले हिची खूप मदत झाली.  त्याच प्रमाणे प्रत्येक ओवी वाचून मुद्रित प्रत दुरुस्त करण्यास पण तिची मदत झाली आहे.

Download The EBOOK

Adhyay
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 1
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 2
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 3
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 4
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 5
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 6
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 7
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 8
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 9
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 10
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 11
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 12
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 13
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 14
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 15
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 16
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 17
Dnyaneshwari Adhyay 1
अध्याय 18

contact

SPAN, 190, N-1, B-SECTOR, CIDCO
Aurangabad - 431003,
Maharashtra


Aashish Parshuram Gokhale: +91 9422704331